Friday, June 5, 2015

"दहावी प"

नमस्कार मंडळी,

आपण कसे आहात ? (Copied from "How are you?'). बऱ्याच दिवसानंतर काहीतरी लिहित आहे. तुम्हाला वाचायला आवडेल अशी अपेक्षा करतो (Copied from "Hopefully you will like it").

दहावीच वर्ष खूप धोकादायक असत अस म्हणतात. मुलींसाठीच नाही तर मुलांसाठी पण :) आणि त्यांच्या पालकांसाठी सुद्धा. आजकाल दहावीला म्हणावं तितका महत्व नाही जितका आमच्या वेळी आणि आमच्या अगोदर असायचं. "म्याट्रिक" पास म्हणजे एखाद्या इंजिनियर पेक्षा कमी नसायच, जुनी म्याट्रिक पास झालेले कार्यकर्ते छातीठोकपणे बोलू शकतात कि आम्ही म्याट्रिक पास आहोत. नववीतून दहावीत जातांना जस केसांना किंवा केसांमध्ये भांग पाडण्याची सवय लागते तसच आणखी एका गोष्टीचा वेड लागते ते म्हणजे "दहावी प कि दहावी फ". कितीवेळा आषाढी-कार्तिकी ची वारी करावी लागेल. "दहावी प" असेल तर पेढा आणि सोबत फरसाण आणि नवीन कपडे, "दहावी फ" असेल तर बैल आणि नांगर.

आम्ही सातवीत असतांना दहावीच्या मुलांना मिशा असायच्या. असे मिशाधारी युवक-तरुण हाफ चड्ड्या घालून शाळेत यायचे. दहावीनंतर चडड्याच रुपांतर फुल प्यांट आणि काळानुसार खांद्यावर "पप्पा पप्पा" बोलणारा दोन वर्षाचा बाळ मध्ये व्हायच. "पप्पा पप्पा" ४-५ वर्ष चालायचं नंतर मग "आबा, अप्पा, दादा" अस ऐकू यायचं. मुलींची तर वेगळीच कसरत होती."फेयर आणि लवली" लावल्याच सगळ्या शाळेला समजायचं. शाळेत येतांना दप्तर आणण्याची फ्याशन दहावीतल्या मुलींना पटत नसायची म्हणून २-४ गृहपाठाच्या वह्या, ३-४ पुस्तके अशी तब्बल ६-८ हातामध्ये घेऊन शाळेत येणारी पोरगी म्हणजे दहावीतली. गणितातली सूत्रे नाही समजली कि मंगळसूत्रे घालण्याची वेळ यायची.

तर मुद्दा असा आहे कि, दहावीचा निकाल लागल्यानंतर बर्याचदा काय करावे असा प्रश्न निर्माण होतो. सन २००० पर्यंत, दहावीनंतर ६०% पब्लिक ला कॉलेज मध्ये जायच होत आणि १०-२०% लोकांना मास्तर, ५%  बी. एस सी एग्री,  ५% दुकान सांभाळायच, ५% आयटया (ITI) आणि उर्वरित मग डॉक्टर किवा इंजिनियर. कॉलेज मध्ये जाणाऱ्यांना काय करायचं ह्याच खूप कन्फ्युजन होत. सायन्स मध्ये इंग्रजी चा प्रोब्लेम आणि कॉमर्स मध्ये गणिताचा. शेवटी कलेने (आर्ट्स) साथ दिली.

बऱ्याच मुलांना दहावीनंतर काय, ह्याच उत्तर लवकर सापडत नाही कधी कधी सापडते पण खूप उशीर झालेला असतो. मोकळ रान असत पण सुरुवात कुठून आणि कशी करायची हे माहित नसत. माझ्यासारखे काहीजण जीवाचा आटापिटा करून रट्टा मारून परीक्षा पास तर होतात पण समजत काही नसत. समजून घ्यायच्या वेळी आम्ही कान बंद करून फ़क़्त रट्टा चालू ठेवला. "शिकला तितका हुकला" हे दहावी नंतर कळाल. नशीब शाळेतले मास्तर चांगले होते म्हणून काही गोष्टी समजून घेतल्या. इंटरेस्ट समजून घ्यायच्या वेळी पुस्तकात डोकी खुपसून बसलो. अगोदर अभ्यास आणि मग खेळ, अभ्यास तर झाला पण खेळायच वय निघून गेल.

दहावी पर्यंतच जग खूप छान असत, अपेक्षा तुमच्या शरीराप्रमाणे वाढलेल्या नसतात. दहावीनंतर अपेक्षा शरीरापेक्षा मोठ्या होतात आणि हळूहळू त्याला गिळून टाकतात. शाळेत निबंध लिहायला कंटाळा यायचा पण आज शाळेविषयी लिहितांना पाने भरून जातात पण शब्द कमी पडतात.

दहावीचा निकाल लवकरच लागणार आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन. विषय गेलेल्यांसाठी जय हरी विठ्ठल आणि अगदीच जास्तच जय हरी विठ्ठल वाटत असेल तर "व्होल वावर इज आवर"

धन्यवाद !,

No comments: